शेतीत तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, आता गावपातळीवरही त्याची झेप जाणवू लागली आहे. यंदाच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचतगटांनी एक आगळावेगळा प्रयोग हाती घेतला आहे — शेतात ड्रोनच्या मदतीने औषध फवारणी!
३२ हजार एकरवर ड्रोन फवारणी
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एकूण ३२ हजार एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एका ड्रोनला २ हजार एकर क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात काम कमी वेळेत पूर्ण होणार आहे.
महिलांचा नवा चेहरा – ड्रोन पायलट
या उपक्रमासाठी महिला बचतगटांना ड्रोन उडविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृत लायसन्सही देण्यात आले आहे. प्रत्यक्ष शेतात काम सुरू करण्यापूर्वी महिलांकडून ट्रायल फवारणी करून घेण्यात येईल, जेणेकरून तांत्रिक उणिवा दूर केल्या जाऊ शकतील.
फायदे – वेळ, श्रम आणि खर्च वाचणार
ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे पंपाद्वारे होणारे औषधाचे नुकसान टाळले जाईल. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर अचूक फवारणी होऊन शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि औषधी खर्च वाचेल. तसेच रोग व किड नियंत्रणात ही पद्धत अधिक वेगवान आणि प्रभावी ठरणार आहे.
रोजगाराचा नवा मार्ग
या उपक्रमामुळे महिलांना केवळ आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख मिळणार नाही, तर गावातच रोजगाराची नवी संधीही खुली होणार आहे. शेतकऱ्यांसाठीही हा एक मोठा दिलासा ठरणार आहे, कारण वेळेत औषध फवारणी झाल्यामुळे पीक उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल.
जिल्हा समन्वयक सुनील सोसे म्हणाले, “या वर्षी खरीप हंगामात महिला बचतगटांमार्फत ड्रोन फवारणीचा प्रयोग राबविला जाणार आहे. प्रशिक्षण आणि ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ३२ हजार एकरवर प्रत्यक्ष फवारणी सुरू होईल.”
