शेतकरी यशोगाथा : बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला तरुण झाला यशस्वी पपई उत्पादक; दोन महिन्यांत कमावले साडेतीन लाख रुपये

सोलापूर, मोहोळ तालुका – शिक्षण थांबले, पण जिद्द नाही! आईच्या मृत्यूनंतर खचलेल्या परिस्थितीतही स्वतःला सावरून एका तरुणाने शेतीत नवा मार्ग शोधला आणि अवघ्या दीड एकरात पपई लागवड करून दोन महिन्यांत साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

हरळवाडी गावातील खंडू म्हाळप्पा माडकर, वय २४, यांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतले. मात्र आईच्या निधनानंतर घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वडील म्हाळप्पा हे पारंपरिक ऊसशेती करत असत, ज्यातून वर्षाला ७०-८० हजार रुपये उत्पन्न मिळत असे. पण परिस्थितीने खंडू यांना वेगळा विचार करायला भाग पाडले.

खंडू यांनी ऊसाऐवजी पपई लागवडीचा निर्णय घेतला. वडिलांनीही त्यांना साथ दिली. ऑक्टोबर महिन्यात दीड एकरात सुमारे १५०० पपईच्या रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण लागवड ही सेंद्रिय पद्धतीने केली. ताक, गूळ, गोमूत्र व शेणखत यांचा वापर करून नैसर्गिक शेती केली.

या सेंद्रिय पद्धतीने लागवडीसाठी एकूण खर्च सुमारे दीड लाख रुपये झाला. मात्र, पपईची विक्री सुरू होताच केवळ दोन महिन्यांतच खंडू माडकर यांना साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आज अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात गाव सोडतात. मात्र खंडू यांचे उदाहरण हे दाखवते की योग्य नियोजन, आधुनिक दृष्टिकोन आणि पारंपरिक पद्धतीत बदल केल्यास शेतीही नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो.

“फक्त शिक्षण असून चालत नाही, त्या शिक्षणाचा उपयोग कसा करतो हे महत्त्वाचं. अर्धा एकर शेतीही जर मन लावून केली, तर ती नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देऊ शकते,” असा आत्मविश्वास खंडू माडकर व्यक्त करतात.

Leave a Comment