सोलापूर जिल्ह्यातून आता फक्त साखर कारखाने नाहीत, तर संपूर्ण देशभरात गूळ, साखर, खतं, तेलं, खनिजं यांची रेल्वेमार्फत वाहतूक होऊ लागली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सोलापूर मध्य रेल्वे विभागाने एकूण ४२१.५६ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून एक नवा मैलाचा दगड गाठला आहे.
गावचा गूळ आसामच्या बाजारात
सोलापुरातील गूळ थेट आसामच्या तिनसुकिया आणि लंका या भागांमध्ये पोचतोय, तर येथील साखर उत्तराखंडमधील रूरकी आणि तामिळनाडूच्या सेलम शहरांपर्यंत प्रवास करतेय. ही माहिती नुकतीच रेल्वे प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली.
ही यशस्वी मालवाहतूक माजी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक लखन झा यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आणि त्याचे फलित सध्याचे व्यवस्थापक ए. के. यादव, मुख्य वाणिज्यिक निरीक्षक दीपक मिश्रा, तसेच वाणिज्य निरीक्षक निहाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक विस्तारले गेले.
मालधक्क्यांचं मजबूत जाळं
सोलापूर, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, भिगवण अशा ११ ठिकाणी मालधक्के (Goods Shed) तयार करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपतींना आपला माल देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवणं सोपं झालं आहे.
२०२४-२५ मधील काही ठळक यशोगाथा
गूळ वाहतूक :
- पंढरपूर आणि बाळे येथून गूळ निर्यातीमधून मिळालं २.७० कोटींचं उत्पन्न
- गूळ वाहतूक ११ रॅक्सपर्यंत वाढली, त्यातून ५.१६ कोटींचा महसूल
साखर आणि गूळ एकत्र वाहतूक :
- लातूर येथून २ रॅक भरून मिळाले १.५९ कोटी रुपये
खत वाहतूक :
- कुर्डूवाडी व पंढरपूरहून कोकण रेल्वेतून वेर्णा येथे खत पाठवण्यात आलं — ३० लाखांचं उत्पन्न
पीओएल वाहतूक (पेट्रोलियम, तेल व ल्युब्रिकंट्स) :
- आयओसीएल पाकणी येथे सुरुवात — मिळाले ३.०१ कोटी रुपये
असे काय काय पाठवले सोलापुरातून?
या वर्षी रेल्वेमार्फत सोलापूर विभागातून साखर, गूळ, सिमेंट, क्लिंकर, डी-ऑइल केक, पेट्रोलियम, खते, कोळसा, राख, जिप्सम, बॉक्साइट, अन्नधान्य, चुनखडी यांसारख्या १५ हून अधिक वस्तूंची मालवाहतूक झाली.
अंक गणितातलं यश
एकूण रॅक लोड: 1,783
एकूण मालवाहतूक: 5.34 दशलक्ष मेट्रिक टन
एकूण महसूल: ₹421.56 कोटी
सोलापूरची गोडी देशभरात पोचतेय
सोलापुरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पिकवलेली गोडी आता देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यांत पोहोचतेय. यात रेल्वे विभागाचं योगदान केवळ वाहतूकपुरतं मर्यादित नाही — तर ही आहे एक आर्थिक साखळी जी शेतकऱ्याला थेट बाजाराशी जोडते.
रेल्वेच्या या व्यावसायिक बदलामुळे सोलापूर विभाग आता केवळ साखरेचा गड नाही, तर संपूर्ण भारताला पुरवठा करणारा एक प्रमुख ‘अन्न व उद्योग वाहतुकीचा केंद्रबिंदू’ बनत चाललाय.
