सोलापूरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा; हजारो हेक्टर पिकांचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश जारी

सोलापूर : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे ते १४ ऑगस्टपर्यंत एकूण ४८५.५ मि.मी. पाऊस पडला असून, हा आकडा संपूर्ण हंगामाच्या सरासरी पावसापेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, उत्तर सोलापूर तालुक्यात तब्बल ६८४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सात मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

१४ हजार हेक्टरवर फटका

उत्तर सोलापूर तालुक्यातच सुमारे १४ हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. विशेषतः सोयाबीन, मका, तूर यांसारख्या पिकांवर अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुका स्तरावर पंचनाम्याचे अहवाल मागवले आहेत. प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या, नुकसान झालेले पीक व हेक्टर याबाबतचे तपशील अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहेत.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

  • मे महिन्यातच जिल्ह्यात २३३ मि.मी. पाऊस पडला होता.
  • जून, जुलै आणि १३ ऑगस्टपर्यंत एकूण २५२ मि.मी. पाऊस नोंदवला गेला.
  • एकत्रित पाहता, चार महिन्यांत ४८५.५ मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा जास्त आहे.

विशेष म्हणजे, उत्तर सोलापूर तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात अपेक्षित असलेला पाऊस आधीच ओलांडला आहे. येथे सरासरी ४५२ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना, आतापर्यंत ६८४ मि.मी. पाऊस झाला आहे.

पुढेही पावसाचा धोका

पावसाळा अजून दीड महिना शिल्लक असून, त्यानंतर परतीचा पाऊसही बाकी आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी संघटनांकडून सरकारने त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment