मातीची काळजी — भरघोस पिकासाठी गुपित मंत्र

सांगली: आजची शेती दोन टोकांच्या बदलातून जात आहे — एका बाजूला हवामान बदलाचे वाढते संकट आणि दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुरू झालेलं अचूक शेतीचं नवं युग. या दोन्हींचा समतोल राखत भविष्यातील शेती अधिक सक्षम करायची असेल, तर सर्वात पहिला पायरीचा दगड म्हणजे मातीचं आरोग्य जपणं.

सांगलीचे प्रयोगशील शेतकरी विनोद तोडकर यांचं मत आहे — “शाश्वत शेतीची पायाभरणी मातीपासूनच सुरू होते. माती बळकट असेल तर हवामान बदलासारखी संकटंही शेतीला कमी फटका देतात.”

हवामान बदलात मातीचे महत्त्व

अनेकजण हवामान बदलावर बोलताना शेतीचे भवितव्य अंधारमय रंगवतात. पण प्रत्यक्षात शेती ही केवळ अन्नउत्पादनाची पद्धत नाही, तर ती वातावरणातील कार्बनचे प्रमाण संतुलित ठेवणारी एक नैसर्गिक यंत्रणा आहे. जंगलांप्रमाणेच शेतजमीनही कार्बन संकुल म्हणून काम करते.
माती, जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत झाल्यास कार्बन ऑफसेट, जैवविविधता क्रेडिट्स यांसारख्या संधींतून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं.

मातीची काळजी कशी घ्यावी?

विनोद तोडकर आपल्या अनुभवातून सांगतात की काही साध्या पण शिस्तबद्ध पद्धतींचा अवलंब केल्यास मातीचे आरोग्य टिकवता येते —

  1. उसाचा पाला जाळू नका – उसाची कुट्टी करून ती शेतात परत मिसळा.
  2. पालापाचोळा व पिकांचे अवशेष खतासाठी वापरा – जाळून टाकण्याऐवजी त्यापासून सेंद्रिय खत तयार करा.
  3. तागासारखी हिरवीखत पीकं गाडा – मातीची सुपीकता आणि सूक्ष्मजीव क्रियाशीलता वाढते.
  4. फेरपालट पद्धती अवलंबा – एकाच पिकाचं वर्षानुवर्षे लागवड टाळा.
  5. करंजीपेंड, निंबोळी पेंड वापरा – नैसर्गिक कीडनाशक व मातीस पोषक घटक पुरवतात.

फायदे — फक्त उत्पादनात नाही, खर्चातही बचत

मातीची काळजी घेतल्याने केवळ पीक चांगलं येतं असं नाही, तर पिकव्यवस्थापनावरचा खर्चही कमी होतो. त्याचबरोबर विषमुक्त अन्नधान्य मिळवण्यासाठी हा सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा टप्पा आहे.

तोडकर सांगतात — “माती बळकट असेल तर पीक लढाऊ होतं, रोगराई कमी होते आणि खतं-कीटकनाशकांवर अवलंबून राहण्याची गरज घटते.”

Leave a Comment