मुंबई : आजच्या घडीला प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असणे गरजेचे झाले आहे. फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे, तर शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, शासकीय योजना, कर्ज प्रक्रिया किंवा इतर अनेक सरकारी कामांसाठी रेशन कार्ड हा महत्वाचा ओळख पुरावा मानला जातो.
म्हणूनच नागरिकांमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, आधीच्या कार्डावर नाव वाढवणे-कमी करणे किंवा तक्रार नोंदवणे याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे आता ही सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतात, त्यामुळे सरकारी कार्यालयांची दगदग टाळता येते.
रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात :
- ओळखीचा पुरावा : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा : वीज बिल, भाडेकरार, आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो
- जुने रेशन कार्ड असल्यास ते रद्द केल्याचा दाखला
नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा कराल?
- सर्वप्रथम अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर (rcms.mahafood.gov.in) भेट द्या.
- तिथे Public Login वर क्लिक करा.
- नवीन वापरकर्ता असल्यास New User Sign Up Here वर क्लिक करून नोंदणी करा. (आधार क्रमांकाद्वारे देखील नोंदणी शक्य आहे.)
- लॉगिन केल्यानंतर Apply For New Ration Card हा पर्याय निवडा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती नीट भरा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- शेवटी Submit For Payment वर क्लिक करून शुल्क ऑनलाइन भरा.
अर्ज पूर्ण झाल्यावर तो तहसील कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जातो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रेशन कार्ड तुमच्या घरी पोस्टाने पाठवले जाते किंवा संबंधित कार्यालयातून घेता येते.
ऑनलाईन प्रक्रियेचे फायदे
- शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत नाहीत.
- वेळ व खर्च दोन्ही वाचतो.
- अर्जाची स्थिती थेट वेबसाईटवर तपासता येते.
- त्रुटी कमी होऊन प्रक्रिया जलद होते.
डिजिटल प्रक्रियेचे अतिरिक्त लाभ
राज्य सरकारने रेशन कार्ड प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. पूर्वी महिनोनमहिने लागणारे काम आता काही दिवसांत पूर्ण होते.
नाव वाढवणे, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे किंवा रेशन कार्डाबाबत तक्रार नोंदवणे – हे सर्व पर्याय आता याच पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ही सेवा अधिक सुलभ व सोयीस्कर ठरली आहे.
