मुंबई : देशातील फलोत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (NHB) फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमात (Cluster Development Programme) दोन नवे घटक समाविष्ट करण्यात आले असून, त्याचा थेट फायदा शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) तसेच उद्योजकांना होणार आहे.
आता या प्रकल्पांतर्गत शेतकरी 25 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवू शकतात. हा कार्यक्रम 2021 पासून सुरू असून, त्याचा व्याप आणि उद्दिष्टे आणखी व्यापक करण्यात आली आहेत.
कोणते नवे घटक जोडले गेले?
बहुपीक उच्च मूल्य समूह (High Value Multi-crop Cluster)
- या गटांतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना परवानगी मिळेल.
- प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 25% पर्यंत म्हणजेच कमाल 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
- प्रकल्पासाठी निवडलेली शेती एकमेकांलगत असावी.
- जर शेती एकत्र नसली, तर डोंगराळ भागात दोन गटांतील अंतर 50 किमीपेक्षा आणि इतर भागांत 80 किमीपेक्षा जास्त नसावे.
शहरी हद्दीनजीक भाजीपाला समूह (Vegetable Cluster near Urban Areas)
- शहरांच्या जवळ ताज्या भाज्यांचे उत्पादन वाढवणे व बाजारपेठेशी थेट जोडणे हा उद्देश आहे.
- यामध्ये टोमॅटो, कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, सिमला मिरची, काकडी, दुधी भोपळा, कोथिंबीर, लिंबू, आले, हिरवी मिरची व लसूण अशा महत्त्वाच्या भाज्यांचा समावेश आहे.
- उत्पादनाबरोबरच संकलन, साठवणूक आणि विपणन साखळीला देखील बळकटी दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांना नेमका काय फायदा?
- शेतमालाला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला दर मिळेल.
- शहराजवळील भाज्यांच्या उत्पादनामुळे ताज्या व दर्जेदार भाज्यांचा पुरवठा वाढेल.
- वाहतुकीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न थेट वाढेल.
- कृषी क्षेत्रात उद्योजक व सहकारी संस्था गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
विशेष म्हणजे, या सुधारणांमुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळेल. शेतकरी-उद्योजक यांना आर्थिक मदत होऊन ग्राहकांनाही परवडणाऱ्या दरात दर्जेदार भाज्या व फळे सहज उपलब्ध होतील.
अर्ज प्रक्रिया
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या संकेतस्थळाला ( nhb.gov.in) भेट द्यावी.
केंद्र सरकारचा हा निर्णय फलोत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, उत्पादन, प्रक्रिया व विपणन या सर्व टप्प्यांना बळकटी देणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच शहरी ग्राहकांनाही सुरक्षित आणि ताज्या भाज्यांचा पुरवठा होईल, हा या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा ठरणार आहे.
