एप्रिल आणि मे 2025 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर आता शासनाकडून दिलासा देण्यात आला असून, सुमारे १४ कोटी ९९ लाख रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT प्रणालीद्वारे (Direct Benefit Transfer) जमा केली जाणार आहे.
15,957 शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा
राज्य शासनाच्या महसूल आणि वनविभागाच्या निर्णयानुसार, धुळे जिल्ह्यातील १५,९५७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एप्रिल महिन्यात एकूण ६,६९६.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. यामुळे १२,२१५ शेतकरी बाधित झाले असून, त्यांना ११ कोटी ४३ लाख ९ हजार रुपये दिले जाणार आहेत.
मे महिन्यातील गारपीटमुळे १,९६१.५३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी ३,७४२ शेतकऱ्यांना ३ कोटी ५६ लाख ५३ हजार रुपये वितरित केले जातील.
थेट बँक खात्यावर भरपाई जमा
ही एकूण ८,६५७.७८ हेक्टर क्षेत्राची भरपाई शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर DBT प्रणालीद्वारे जमा केली जाईल. शासनाने यासंदर्भात पारदर्शकतेवर भर दिला असून, मदतीचे वितरण योग्य प्रक्रियेद्वारे करण्यात येईल.
कर्ज वसुलीसाठी मदतनिधी वापरण्यास बंदी
शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, ही भरपाईची रक्कम कोणत्याही बँकेने कर्ज वसुलीसाठी वापरू नये. ही आर्थिक मदत केवळ शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी असून, आगामी हंगामासाठी आधार ठरेल.
