नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस (दि. २३ ते २७ ऑगस्ट २०२५) दरम्यान आकाश ढगाळ राहणार असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात कमाल तापमान २८ ते ३० डिग्री सेल्सियस तर किमान तापमान २२ ते २३ डिग्री सेल्सियस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग सरासरी १५ ते २२ किमी प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे.
ढगाळ व दमट हवामानाचा थेट परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेऊन कीड व रोग नियंत्रण उपाय वेळेवर करणं गरजेचं आहे.
खरीप पिकांसाठी मार्गदर्शन
- पेरणी केलेल्या पिकावर कीड किंवा रोग दिसल्यास त्वरित स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- जून महिन्यात पेरणी केलेल्या भुईमुग पिकात वापसा आल्यास हात कोळप्याने खुरपणी करावी.
- मुग व उडिद पिके फुलकळी लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना कीड-रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारणी करावी.
- यासाठी मोनोक्रोटोफॉस (३६% SL) ६२५ मि.ली. + पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- खरीप पिकांमध्ये रोग नियंत्रणासाठी ६ किलो ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ५० किलो कंपोस्ट खतात मिसळून दोन ओळींमध्ये जमिनीत मिसळावे व त्यानंतर पाणी द्यावे.
वेलवर्गीय व भाजीपाला पिकांसाठी सल्ला
- ढगाळ हवामानामुळे डाउनी मिल्ड्यू (केवडा) रोगाचा धोका वाढतो.
- यासाठी अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% SC) २ मि.ली. किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% WP) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी
- व्हर्टीसिलियम लेकॅमी हे जैविक किटकनाशक (१ किलो / २०० लिटर पाणी) वापरावे,
- किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मि.ली. / १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- खरीप मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार आणि वेलवर्गीय पिकांमध्ये खुरपणी करून नत्र खताचा पहिला हप्ता द्यावा.
- सतत ढगाळ वातावरण असल्यास भाजीपाला पिकांवर ७ ते ८ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.
सल्ला देणारे: ग्रामीण कृषी मौसम सेवा व विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
