राज्यात पावसाची पुनरागमनाची चाहूल: 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस?

राज्यात सध्या खरीप हंगाम चांगल्या सुरुवातीसह सुरू आहे. जुलै महिन्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदी झाले. मात्र काही ठिकाणी अति पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे चित्रही दिसून आले. गेले काही दिवस राज्यभर ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसाचे वातावरण आहे, परंतु मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे.

पण आता हवामानात पुन्हा बदल घडणार असल्याचे संकेत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिले आहेत. त्यांनी ऑगस्ट महिन्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तारखांना पावसाचा जोर असेल, याचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे.

9 ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत या भागांमध्ये पावसाला विश्रांती राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीत शेतीची कामे उरकून घ्यावीत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

9 ऑगस्टपासून मात्र कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा सिलसिला सुरू होण्याची शक्यता आहे.

विदर्भ-मराठवाड्यासाठी डख यांचा विशेष इशारा

29 जुलैपासून काही ठिकाणी उघडं वातावरण राहणार असले तरी, स्थानिक हवामानामुळे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्यास सुपर फॉस्फेट टाकावे आणि झाडांची मर रोखण्यासाठी त्यांना पाय देण्याचा सल्लाही डख यांनी दिला आहे.

पुढील आठवड्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस?

डख यांच्या अंदाजानुसार, पुढील जिल्ह्यांमध्ये खालीलप्रमाणे पावसाची शक्यता आहे:

  • 9 ऑगस्ट: कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ
  • 11 ऑगस्ट: जालना, छत्रपती संभाजीनगर
  • 11 ते 16 ऑगस्ट: नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर (अहिल्यानगर), पुणे

डख यांचे मत आहे की, या काळात राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जिथे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे, त्या जिल्ह्यांतही 9 ते 16 ऑगस्टदरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment