महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या मॉन्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे खरीप पेरण्यांची गतीही वाढली आणि शेतीच्या दृष्टीने अनेक भागात समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, यावर्षी पावसाचे सुरुवातीपासूनच असलेले सातत्य आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागांतील पावसाचे वितरण योग्य प्रमाणात झाले. त्यामुळे धरणांमध्येही अपेक्षित पाणीसाठा जमा झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेली धरणे भरून निघाली आहेत. हे केवळ शेतीसाठीच नाही तर संपूर्ण ग्रामीण भागासाठीही उभारी देणारे संकेत आहेत.
कुकडी प्रकल्पामध्ये साठवलेल्या पाण्याचे चित्र आशादायक
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाचा कुकडी प्रकल्प यावर्षी विशेष चर्चेत आहे. यामधील प्रमुख धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २०% जास्त उपयुक्त पाणीसाठा आहे. हा प्रकल्प शेतीसाठी पाणीपुरवठ्याचा एक मुख्य स्रोत आहे, आणि यंदा त्यातील जवळपास सगळीच धरणे भरून वाहू लागली आहेत.
डिंभे धरण 100% भरून ओव्हरफ्लो, 9400 क्युसेक विसर्ग सुरू
या प्रकल्पातील सर्वात मोठे धरण, डिंभे धरण – जे घोड नदीवर वसलेले आहे – हे सध्या 100% भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातून सध्या तब्बल 9400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुलना करता, मागील वर्षी याच काळात कुकडी प्रकल्पात फक्त 46% पाणीसाठा होता, तर यंदा तो वाढून 66% (19477 एमसीएफटी) इतका झाला आहे.
या धरणांचाही झाला पूर्ण भराव
कुकडी प्रकल्पातील अन्य महत्त्वाची धरणे – येडगाव, घोड, वडज, विसापूर आणि चिल्हेवाडी – देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विशेष उल्लेख करायचा झाल्यास, विसापूर धरण तब्बल 25 वर्षांनी प्रथमच 100% भरले आहे. तसेच घोड धरण मागील महिन्यातच ओव्हरफ्लो झाले होते.
दुसरीकडे, माणिक डोह धरण सध्या 38% भरलेले आहे, तर पिंपळगाव जोगे हे धरण 56% भरले आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
या धरणांमधील भरगच्च पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम वेळेवर सुरू झाला असून, येणाऱ्या दिवसांत सिंचनाच्या बाबतीतही फारशी अडचण भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
