राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोकाटे हे विधीमंडळाच्या सभागृहात बसून मोबाईलवर रमी खेळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत “X” (पूर्वीचं ट्विटर) खात्यावर पोस्ट केला आहे. सध्या राज्यात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, हमीभाव, आणि पीकविमा योजना या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना, खुद्द कृषीमंत्री सभागृहात असा वेळ घालवत असल्याचं समोर आलंय, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“खेतीपर भी आओ ना महाराज!” – रोहित पवारांचा घणाघात
या व्हिडिओसोबत रोहित पवारांनी लिहिलं आहे,
“सत्ताधारी राष्ट्रवादी भाजपला विचारल्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत असताना, कृषीमंत्री मात्र सभागृहात मोबाईलवर रमी खेळत बसले आहेत. याहून दुर्दैवाची गोष्ट काय असेल?”
“शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी ते डोळ्यादेखत दुर्लक्षित करत आहेत. ‘कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज’ – ही शेतकऱ्यांची आर्त साद त्यांना ऐकू येईल का?”
राजकीय वर्तुळात संतापाची लाट
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “शेतकरी आत्महत्या, पीकविमा आणि भावांतरसारख्या गंभीर मुद्द्यांवर बोलण्याऐवजी, मंत्र्यांचा वेळ गेम खेळण्यात जातो, ही खेदजनक गोष्ट आहे,” अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
काही नेत्यांनी तर कोकाटे यांचा राजीनामा मागितला आहे. “जेव्हा मंत्रीच आपल्या जबाबदाऱ्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत, तेव्हा सामान्य शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो, याचा विचार करायला हवा,” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सत्ताधाऱ्यांकडून अद्याप मौन
या प्रकरणावर कृषीमंत्र्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, लोकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. विशेषतः शेतकरी वर्गामध्ये सरकारबद्दल अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र आहे.
