जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रवंजे बु. गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे खतांच्या बेकायदेशीर विक्रीचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. खरीप हंगामाच्या या टप्प्यावर पीकांना खते देण्याची नितांत गरज असताना स्थानिक विक्रेत्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक दराने खते विकली जात आहेत.
जादा दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका
शेतकरी ज्ञानेश्वर भगवान कोळी यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. अशी परिस्थिती फक्त एकाच गावापुरती मर्यादित नाही, तर अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना हा अनुभव येतो आहे. शासनाच्या दरानुसार खते न मिळाल्याने बळीराजाला शेतातल्या गरजा भागवण्यासाठी मजबूरीने जादा पैसे मोजावे लागत आहेत.
काही दुकानांत पक्के बिल दिले जातात, तर काही ठिकाणी फक्त साधी पावती मिळते. अनेक कृषी केंद्रांवर दरपत्रकच लावले जात नाहीत किंवा लावले असले तरी त्यावर योग्य दर लिहिलेले नसतात. यामुळे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून आर्थिक शोषण केले जाते.
खतांच्या काळाबाजारावर मराठा सेवा संघाचा इशारा
चाळीसगाव तालुक्यात खतांच्या उपलब्धतेमध्ये अनियमितता आहे. युरियासह अन्य खतांच्या काळाबाजाराचा आरोप करत मराठा सेवा संघाने कृषी विभागाला कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. वेळेवर आणि योग्य दराने खतांचा पुरवठा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एक युरिया बॅग, अनेक अटी!
युरियाच्या ५० किलोच्या एका बॅगची अधिकृत किंमत २६६ रुपये असली, तरी प्रत्यक्ष विक्रीत ती ३०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एवढंच नव्हे तर, युरिया घेण्यासाठी विक्रेते इतर खते खरेदी करण्याचा दबाव टाकतात. म्हणजेच एका युरिया बॅगेवरही व्यापाऱ्यांचा अतिरिक्त ३०-४० रुपयांचा नफा होतो.
पहाटेपासून रांगेत शेतकरी
तालुक्यातील काही दुकानांपुढे पहाटेपासून शेतकऱ्यांची रांग लागते. आधार कार्ड घेऊन दोन बॅगा खत मिळाव्यात, म्हणून शेतकरी उन्हातान्हात उभा राहतो. ही अवस्था शेतकऱ्याच्या मानसिकतेवरही परिणाम करत आहे.
शासनाने लक्ष घालावे, मागणी वाढवावी
शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे निवेदन देऊन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काळाबाजार थांबवण्यासाठी पारदर्शक तपासणी आणि अतिरिक्त खताची तातडीने मागणी शासनाकडे करावी, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.
या वेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान पाटील, रयत क्रांती सेनेचे डॉ. अजय पाटील, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
