मुंबई : शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांच्या चकरा माराव्या लागण्याची वेळ आता संपणार आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि PSB Alliance यांच्या त्रिपक्षीय करारामुळे पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे.
या नव्या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे.
कर्ज प्रक्रियेत क्रांती
या उपक्रमात ॲग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कागदपत्रांचा बोजा आणि बँकांच्या फेऱ्या टाळून पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यावर कर्ज मंजुरी मिळणार आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे. कारण यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल तसेच प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईल.
कर्जासाठी आवश्यक अटी
पीक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात :
- शेतकऱ्याचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे बंधनकारक आहे.
- शेतकरी ॲग्रिस्टॅक (Farm Registry) मध्ये नोंदणीकृत असावा.
- जमीन स्वतःच्या नावावर असावी.
अर्ज करण्याची पद्धत
१. सर्वप्रथम www.jansamarth.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाइल क्रमांक वापरून नोंदणी करा.
२. Agri Loan – Kisan Credit Card हा पर्याय निवडा.
३. जिल्ह्याचे नाव व आधार क्रमांक भरून ई-केवायसी तपासणी करा.
४. वैयक्तिक माहिती, बँक तपशील, आर्थिक माहिती व जमिनीची माहिती भरून अर्ज सादर करा.
५. पात्र शेतकऱ्यांना शासन व बँकांच्या निकषांनुसार पीक कर्ज मंजूर केले जाईल.
या उपक्रमाचे फायदे
- कर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल व पारदर्शक झाली आहे.
- शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचतो.
- बँकांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरत नाही.
- अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहता येते.
- कमी वेळेत कर्ज मंजुरी मिळते.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अकोला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी शेतकऱ्यांना तातडीने जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
