नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) उपराष्ट्रपति पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तमिळनाडूतील ज्येष्ठ नेते सीपी राधाकृष्णन यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही घोषणा केली. मागील चार दशकांपासून राजकारण व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या राधाकृष्णन यांना तमिळनाडूतील आदरणीय चेहरा मानले जाते.
ही उमेदवारी ही फक्त एका नेत्याच्या निष्ठेची दखल नाही, तर भाजपाच्या दक्षिण भारतातील पायाभरणीचा भाग आहे. तमिळनाडूत आतापर्यंत पाय रोवण्यासाठी पक्षाला मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांच्या नावाने पक्षाने राज्यातील मतदारांना आणि राजकीय समीकरणांना साधण्याचा प्रयत्न केला आहे.
द्रमुकचे गणित आणि अडचणी
राधाकृष्णन हे तमिळ असल्याने द्रमुक (DMK) समोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच, “आम्ही विरोधी आघाडीत आहोत, आणि अंतिम निर्णय आघाडी घेईल,” असे मत व्यक्त केले. म्हणजेच, द्रमुकचा ठाम निर्णय अजून स्पष्ट नाही.
इतिहासातही अशा प्रकारचे उदाहरण दिसले आहे की, उमेदवाराच्या राज्याशी किंवा ओळखीशी निगडीत कारणांमुळे विरोधी पक्षांनी वेगळा निर्णय घेतला आहे. प्रतिभा पाटील यांच्या निवडणुकीत शिवसेनेने, तर प्रणब मुखर्जी यांच्या निवडणुकीत शिवसेना व जेडीयूने विरोधक असूनही पाठिंबा दिला होता.
धनखडांचा अनुभव आणि NDA ची सध्याची ताकद
मागील उपराष्ट्रपति निवडणुकीत जेव्हा एनडीएने जगदीप धनखड यांना उमेदवार केले होते, तेव्हा तृणमूल काँग्रेसने मतदान टाळले होते. त्यावेळी धनखड यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. या वेळी एनडीएकडे सुमारे 422 मतं निश्चित आहेत. बीजेडी, वायएसआरसीपी आणि बीआरएससारख्या प्रादेशिक पक्षांनी पुन्हा समर्थन दिल्यास NDA च्या उमेदवाराचा विजय जवळपास ठरलेला आहे.
द्रमुकसमोर धर्मसंकट
तमिळनाडूत 32 खासदार असलेली द्रमुक ही सर्वात मोठी प्रादेशिक ताकद आहे. अशा वेळी त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, राज्यातून येणाऱ्या नेत्याला पाठिंबा द्यावा का, की विरोधी आघाडीशी निष्ठा दाखवावी? पुढील वर्षी राज्यात निवडणुका असल्याने हा निर्णय अधिक संवेदनशील ठरणार आहे.
जर राधाकृष्णन निवडून आले, तर ते उपराष्ट्रपति पद भूषवणारे तमिळनाडूतील तिसरे नेते ठरतील.
