चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतची बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर ‘कूली’ प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहे. रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या वीकेंडमध्येच या सिनेमाने तुफानी कमाई करत विक्रम रचला आहे.
14 ऑगस्टला ‘कूली’चा मुकाबला ‘वॉर 2’ सोबत झाला. तरीदेखील रजनीकांतच्या स्टार पॉवरसमोर क्लॅशचा काहीही परिणाम झाला नाही. उलट ‘कूली’ ही 2025 मध्ये सर्वात वेगाने 100 कोटींचा टप्पा पार करणारी तमिळ फिल्म ठरली आहे.
दिवसागणिक बॉक्स ऑफिस कमाई
- पहिला दिवस: 65 कोटी
- दुसरा दिवस: 54.75 कोटी
दोन दिवसांतच चित्रपटाने 100 कोटींचा विक्रम केला आणि या वर्षातील ‘फास्टेस्ट 100-कोटी क्लब’मध्ये एंट्री घेतली. याआधी विकी कौशलच्या छावाकडे हा रेकॉर्ड होता.
तिसऱ्या दिवशी कमाईत किंचित घट झाली, पण तरीही एकूण संख्येने चित्रपटाने 150 कोटींचा आकडा गाठला. चौथ्या दिवशी सुद्धा फिल्मची कमाई दमदार राहिली. ट्रेड पोर्टल सॅकनिल्कनुसार, रविवारी (डे 4) ‘कूली’ने 28.95 कोटींची कमाई करत आपला नेट इंडिया कलेक्शन 188.2 कोटींवर नेला.
वर्ल्डवाइड कमाईचा विक्रम
फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘कूली’चा कहर कायम आहे. तीन दिवसांच्या आतच या चित्रपटाने 320 कोटी वर्ल्डवाइड कलेक्शन करत आपला बजेट सहज वसूल केला आहे. यासह ‘कूली’ ही तमिळ सिनेमातील सर्वात वेगाने 300 कोटींचा टप्पा पार करणारी फिल्म ठरली आहे.
स्टारकास्ट आणि स्पेशल कॅमिओ
लोकेश कनगराज दिग्दर्शित या सिनेमात रजनीकांत प्रमुख भूमिकेत असून, नागार्जुन, उपेंद्र, सत्यराज आणि श्रुती हासन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय आमिर खान आणि पूजा हेगडे यांचे खास कॅमिओ सुद्धा प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहेत. संगीत दिग्दर्शन अनुरुद्ध रविचंदर यांचे असून, गाण्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
एकूणच ‘कूली’च्या बॉक्स ऑफिसवरील या शानदार कामगिरीने रजनीकांत पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, त्यांचा क्रेझ अजूनही तितकाच प्रचंड आहे.
