बीड जिल्हा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती दुष्काळग्रस्त जमीन आणि अपुरी पावसाची परिस्थिती. पण या कठीण परिस्थितीतही एका दिव्यांग शेतकऱ्याने आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने असा प्रयोग केला की संपूर्ण भागात त्याची चर्चा सुरू आहे.
शशिकांत गणेश इंगोले हे नाव आज बीडमध्ये लिंबू शेतीसाठी ओळखले जाते. पारंपरिक शेतीला वळसा घालत त्यांनी 2 हेक्टर क्षेत्रात 550 लिंबाची झाडे लावली. केवळ कमी पाणी, कोणतेही रासायनिक खत न वापरता आणि योग्य नियोजन करून ते दरवर्षी 20 ते 22 लाख रुपये कमवत आहेत.
कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून शेती
इंगोले सांगतात, “मी दिव्यांग आहे, पण मेहनत थांबवली नाही. माझी पत्नी आणि पालकांनी माझ्या बरोबरीने मेहनत घेतली. झाडांना उन्हाळ्यात तगवण्यासाठी मी वेगळं तंत्र वापरतो. पावसाळ्यात जास्त फुले उमलू नयेत म्हणून जून-जुलैमध्ये आणि नंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये युरियाचा वापर करतो. यामुळे उन्हाळ्यातील उत्पादन भरघोस मिळतं.”
दुष्काळातही फुलणारं सोनं
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासह स्वतःच्या अनुभवावर आधारलेली इंगोले यांची पद्धत आज इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. त्यांनी पाच वर्षांच्या झाडांपासून आतापर्यंत तब्बल 30 लाख रुपयांचं उत्पादन घेतलं आहे. या वर्षी ते 40 लाखांचं उत्पादन मिळवण्याचा अंदाज वर्तवत आहेत. त्यांच्या मते, “नैसर्गिक खतांचा वापर झाडांना ताकद देतो, आणि रासायनिक खत टाळल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते.”
कृषी विभागाची साथ आणि गावकऱ्यांचा विश्वास
बीडचे कृषी सहाय्यक विकास सोनावतीकर सांगतात, “रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फंडकर योजनेअंतर्गत इंगोले यांना मदत झाली. बीड शहराजवळ बाजारपेठ असल्याने लिंबाला नेहमीच चांगली मागणी असते.” आज या भागातील अनेक शेतकरी इंगोले यांच्या बागेला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत.
बीडसाठी नवा मार्ग
जिथे पिके पावसावर अवलंबून असतात, तिथे लिंबू शेतीने एक नवा पर्याय दिला आहे. लिंबाचे झाड कोणत्याही हंगामात लावता येते आणि दुष्काळाचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. इंगोले यांच्या यशस्वी प्रयोगामुळे आता बीडमधील अनेक शेतकरी या दिशेने पावले टाकत आहेत. कष्ट, नियोजन आणि योग्य तंत्र यांच्या आधारे दुष्काळी जमिनीतही सुवर्णसंधी मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
