सातपुड्याच्या उघड्या माळरानावर उभं राहिलं हिरवंगार जंगल – ‘बिलाड्या बाबा’ यांची प्रेरणादायी कहाणी

जेव्हा निसर्गाशी प्रेम असतं, तेव्हा माणूस काय काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील ७० वर्षीय बिलाड्या जुगला वळवी, ज्यांना आज संपूर्ण खान्देश “बिलाड्या बाबा” या नावाने ओळखतो. ज्याप्रमाणे आसाममधील पद्मश्री पुरस्कार विजेते जादव पायेंग यांनी एका मोकळ्या बेटावर स्वतःचं जंगल उभं केलं, तशीच किमया बिलाड्या बाबांनी खान्देशच्या माळरानावर करून दाखवली आहे.

हिरवळ निर्माण करण्याचा ध्यास

बिलाड्या बाबा यांनी गेल्या वीस वर्षांत स्वतःच्या खर्चाने तब्बल २५ हजारांहून अधिक रोपं लावली आहेत. यातील सुमारे १७ हजार झाडं आज मोठी होऊन त्या परिसराला जणू जंगलाचं रुप देत आहेत. पूर्वी या सातपुड्याच्या डोंगररांगा वनसंपदेनं भरलेल्या होत्या. पण काळाच्या ओघात ती हिरवळ नष्ट झाली. सरकार आणि विविध सामाजिक संस्था यासाठी प्रयत्न करत असतानाच, बिलाड्या बाबांनी मात्र स्वतःहून हे काम हाती घेतलं.

स्वखर्चातून जलसंधारण आणि वृक्षारोपण

असली (ता. अक्राणी) गावाजवळ असलेल्या डोंगराळ भागात पाणी नव्हतं, त्यामुळे बाबांनी दुसऱ्या घाटातून चारी खोदून पाणी आणलं. वेळप्रसंगी डोक्यावरून पाणी वाहून झाडांना दिलं. हे करताना त्यांना त्यांच्या मुलाचा – विजय वळवी याचा मोठा आधार मिळाला. विजय दरवर्षी हजारो रोपं विविध प्रजातींची घेऊन येतो आणि बाबांच्या मिशनमध्ये साथ देतो.

जंगलातच राहून संवर्धन

वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या ६० एकर जागेवर बिलाड्या बाबांनी आंबा, साग, बांबू, चारोळी, महू, आवळा यांसारख्या विविध प्रजातींची झाडं लावली. त्यांनी त्या भागात एक छोटीशी झोपडी उभारून जंगलातच वास्तव्यास सुरुवात केली. साप, बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रत्येक झाड स्वतःचं मूल समजून त्यांनी त्यांचं जतन केलं.

मानवी दृष्टिकोनातून कौतुकाची गरज

जमीन ही वन विभागाची असल्यामुळे बाबांचे हे काम सरकारी दृष्टीने अधिकृत नव्हतं. पण पर्यावरणाच्या समतोलासाठी त्यांनी जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्यांचं कार्य केवळ झाडं लावण्यापुरतं मर्यादित नाही, तर एका उघड्या, निर्जीव माळरानाला पुन्हा एकदा जिवंत केलंय त्यांनी. त्यांच्या कुटुंबीयांची आणि गावकऱ्यांची मागणी आहे की शासनाने बिलाड्या बाबांच्या कामाचं औचित्य ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावं.

शेवटी एवढंच म्हणता येईल की, हिरवाईचं स्वप्न उराशी बाळगून, कधीही प्रसिद्धीच्या झोतात न राहता एक सामान्य माणूस अपार मेहनतीने निसर्गासाठी काय करू शकतो, हे बिलाड्या बाबांनी सिद्ध केलं आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी आणि अशा हिरवळीचे स्वप्न प्रत्येक भागात साकार होवो!

Leave a Comment