मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला. देशभरातील तब्बल 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये थेट जमा झाले असून, या वेळी एकूण 20 हजार कोटी रुपयांचा निधी डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून वितरित करण्यात आला.
तथापि, या मोठ्या आर्थिक मदतीतून अनेक शेतकरी वंचित राहिल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहेत. त्यामुळे “आपल्या खात्यात पैसे का आले नाहीत?” हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.
हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे
कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार खालील कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही –
- ई-केवायसी पूर्ण न केलेली असणे
- आधार कार्ड बँक खात्याशी न जोडलेले असणे
- जमिनीची पडताळणी अपूर्ण राहणे
- बँक तपशील चुकीचा असणे
- एका कुटुंबातील अनेक सदस्यांनी लाभासाठी नोंदणी करणे
घरबसल्या ई-केवायसी कशी कराल?
शेतकरी काही मिनिटांत ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- अधिकृत संकेतस्थळावर pmkisan.gov.in भेट द्या.
- होमपेजवरील ई-केवायसी पर्याय निवडा.
- आपला 12 अंकी आधार क्रमांक टाइप करून ‘शोधा’ वर क्लिक करा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका व सबमिट करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर “ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण” असा संदेश दिसेल.
मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर?
जर मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसेल, तर शेतकऱ्यांनी जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) मध्ये जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. यामुळे खाते आधारशी थेट जोडले जाईल आणि पुढील हप्त्यात अडचण येणार नाही.
तक्रारींसाठी हेल्पलाइन
जर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही हप्ता खात्यात जमा झाला नसेल, तर शेतकरी खालील ठिकाणी संपर्क करू शकतात –
- टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: 1800-180-1551
- जवळचे CSC सेंटर
- स्थानिक कृषी अधिकारी, तलाठी किंवा जिल्हा कृषी विभागाचे कार्यालय
त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना अजून 20 वा हप्ता मिळालेला नाही त्यांनी तातडीने आपली कागदपत्रे तपासून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील हप्त्यांमध्येही त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागेल.
