मुंबईत पावसाचा जोर कायम; कोकण-घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : मुंबईकरांसाठी गेली काही दिवसं पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून, सोमवारी सकाळपर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असून, काही भागात कमी वेळेत जास्त पावसाची शक्यता आहे.

शहरातील अंधेरी, घाटकोपर, दक्षिण मुंबई, वांद्रे आणि नवी मुंबई परिसरात रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला. परिणामी सखल भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाब क्षेत्रं तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अचानक वाढले आहे. मान्सूनचा पट्टा सध्या जैसलमेर, उदयपूर, रतलाम, जगदलपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि गुजरातकडे जाणारा पावसाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोकण-घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने आज कोकण किनारपट्टी व घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि नद्या-नाल्यांच्या काठावरील भागात अनावश्यक हालचाल टाळावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

दोन प्रणाली पावसाला पोषक

उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशा किनाऱ्यावर नवीन कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली पुढील २४ तासांत अधिक तीव्र होऊन जमिनीवर सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर विदर्भावरही आणखी एक कमी दाब प्रणाली सक्रिय असून, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार आहे.

गेल्या काही तासांत मुंबईतील पावसाची नोंद

  • कुलाबा : १३.२२ मिमी
  • चर्चगेट : ८.४ मिमी
  • दादर अग्निशमन केंद्र : १३.२ मिमी
  • वरळी शाळा : १७ मिमी
  • वांद्रे अग्निशमन केंद्र : १९.३ मिमी
  • नायर रुग्णालय : १३.९७ मिमी

आज ज्या भागांना पावसाचा इशारा

  • अतिमुसळधार पाऊस : मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
  • अतिवृष्टी : रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट, कोल्हापूर घाट
  • मेघगर्जनेसह पाऊस : धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ इ.

मुंबई आणि राज्यातील बहुतांश भागांत हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा लागू आहे. नागरिकांनी प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment