दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक दिवशी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी एक मोठी घोषणा केली. १५ ऑगस्टपासून देशभरात ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ लागू होत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी केंद्र सरकारने राखून ठेवला असून, पुढील दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मोदींनी भाषणात सांगितले – “युवकांसाठी आजचा दिवस डबल दिवाळीप्रमाणे आहे. रोजगाराच्या नव्या संधी आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा मोठा टप्पा आहे.”
युवकांना आणि कंपन्यांना थेट लाभ
या योजनेचा फायदा दुहेरी पद्धतीने होणार आहे. खासगी क्षेत्रात प्रथमच नोकरी मिळवणाऱ्या युवकांना सरकारकडून थेट १५,००० रुपयांचे प्रोत्साहन मिळणार आहे. दुसरीकडे, जे नियोक्ता नवीन भरती करतील, त्यांनाही प्रति कर्मचारी दरमहा ३,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळेल. विशेषतः उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राला यामध्ये अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे.
१.९२ कोटी युवकांना पहिली नोकरी
सरकारी अंदाजानुसार, या योजनेतून येत्या दोन वर्षांत ३.५ कोटी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यापैकी जवळपास १.९२ कोटी युवक पहिल्यांदाच कामकाजाच्या क्षेत्रात सहभागी होतील. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी श्रम व रोजगार मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विकसित भारत मिशनचा पाया
मोदींनी ही योजना ‘विकसित भारत मिशन’चा महत्त्वाचा पाया असल्याचे स्पष्ट केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित, आत्मनिर्भर आणि समावेशक राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रोजगार निर्मितीबरोबरच युवकांना आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग खुला करण्याचा हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
