नववीपर्यंत शिक्षण, पण जिद्दीने उभी केली नर्सरी; वर्षाला 8 लाखांची कमाई करणारा शेतकरी

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी, पारंपरिक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवणे आजच्या काळात कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसायांचा मार्ग निवडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दारफळ (बीबी) गावातील समाधान साठे यांची कहाणी अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक आहे.

नववीपर्यंतच शिक्षण झालेले समाधान साठे हे पूर्वी एका शेतात कामगार म्हणून राबत होते. स्वतःची नर्सरी सुरू करण्याचा विचार त्यांनी 2007 साली केला. केवळ एक गुंठा जागा आणि थोडा अनुभव घेऊन त्यांनी हा प्रवास सुरू केला. सुरुवातीला बाहेरून कलिंगडाच्या रोपांची खरेदी करून विक्री सुरू केली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःच रोपांची निर्मिती सुरू केली.

आज, त्यांची नर्सरी दहा गुंठ्यांवर पसरली आहे आणि येथे टोमॅटो, झेंडू, ढोबळी मिरचीसह विविध भाजीपाल्याची रोपं तयार होतात. त्यांच्या रोपांची मागणी तुळजापूर, धाराशिव, लातूर, अक्कलकोट, कर्नाटक आणि सांगोला येथील शेतकऱ्यांकडून होते.

सर्व खर्च वजा करून समाधान साठे दरवर्षी 7 ते 8 लाख रुपये कमावतात. त्यांची ही कहाणी जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर शिक्षण कमी असूनही मोठे यश मिळवता येते, हे सिद्ध करते.

Leave a Comment