बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपिकता कार्यक्रम राबवताना २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यात तब्बल १५ ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना माती तपासणीसाठी दूरवर जाण्याची गरज राहणार नाही, आणि वेळ, खर्च तसेच श्रम वाचतील.
या प्रयोगशाळांच्या माध्यमातून मातीच्या गुणवत्तेनुसार पिकांचे नियोजन करता येणार असून, उत्पादनात लक्षणीय वाढ साधता येईल. राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यात यंदा ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १५ प्रयोगशाळा बुलढाणा जिल्ह्यात उभारल्या जाणार आहेत.
ही प्रयोगशाळा चालविण्याची संधी कृषी चिकित्सालय, कृषी व व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, निविष्ठा विक्रेते, महिला बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयीन युवक-युवतींना मिळणार आहे.
शासनाकडून दीड लाख रुपये अनुदान
प्रत्येक प्रयोगशाळेसाठी शासन १.५ लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. ही रक्कम आवश्यक उपकरणे, साहित्य आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरली जाईल.
पात्रता निकष
- वय: १८ ते २७ वर्षे
- शिक्षण: दहावी उत्तीर्ण (विज्ञान विषयासह)
- संगणक ज्ञान: एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक
- प्रयोगशाळेसाठी स्वतःच्या मालकीची ४ वर्षांपेक्षा जुन्या नसलेली इमारत असणे आवश्यक
- आधारकार्ड आवश्यक
अर्ज प्रक्रिया
इच्छुकांनी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जैविक कीड प्रयोगशाळा, बुलढाणा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा.
जर अर्जांची संख्या ठरवलेल्या लक्षांकापेक्षा जास्त झाली, तर जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत पारदर्शक सोडत काढून अर्जदारांची निवड केली जाईल.
ही योजना केवळ माती परीक्षणाची सोय जवळ आणणार नाही, तर ग्रामीण भागात तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल.
