लम्पी रोगाचा जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव; पशुवैद्यकांचा महत्त्वाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने शिरकाव केला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि सोयगाव तालुक्यात पशुधनाला या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

स्वच्छतेकडे विशेष लक्ष

लम्पी रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वप्रथम गोठ्यात स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. जे. तळेकर यांनी दिला. गोठ्यात स्वच्छता नसेल तर माशा व डासांची संख्या वाढते, ज्यामुळे हा आजार जलद पसरतो.

लसीकरण मोहिमेत मोठी प्रगती

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत एप्रिल महिन्यात जिल्ह्यासाठी 4 लाख 19 हजार 200 लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यापैकी तब्बल 4 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मोहीम सुरू केली.

आढळलेले रुग्ण जनावरे

सध्या जिल्ह्यातील काही ठिकाणी लम्पीची लागण झालेली जनावरे आढळली आहेत —

  • तिसगाव (छत्रपती संभाजीनगर) : 1 गोऱ्हा
  • हिवरा (फुलंब्री) : 1 गाय, 1 वासरू
  • जरंडी (सोयगाव) : 1 बैल

लम्पी झाल्यास काय करावे?

जनावरांना लम्पीची लक्षणे दिसल्यास लगेच जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. जिल्ह्यातील काही नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले असून, त्यापैकी काही पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व जनावरांवर सध्या योग्य उपचार सुरू आहेत.

पशुपालकांसाठी सूचना

  • गोठ्यात स्वच्छता आणि कोरडेपणा राखा
  • माशा व डासांची संख्या कमी करण्यासाठी औषधांचा वापर करा
  • लसीकरण वेळेत पूर्ण करा
  • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवा

लम्पी रोग वेळेत ओळखून योग्य उपाययोजना केल्यास मोठे नुकसान टाळता येते, असा सल्ला पशुवैद्यकांनी दिला आहे.

Leave a Comment