आयटी नोकरीला रामराम! दाम्पत्याने सुरू केला दुग्ध व्यवसाय, महिन्याला लाखोंची उलाढाल

आजकाल अनेक तरुणांचे स्वप्न असते – मोठ्या पगाराची आयटी नोकरी, एसी ऑफिस आणि शहरातील ग्लॅमर. पण पुण्याजवळच्या पुनावळे गावातील नवनाथ कुदळे यांनी मात्र आयुष्याला वेगळं वळण दिलं. संगणकाच्या पडद्याऐवजी त्यांनी गायी-म्हशींची सेवा निवडली आणि पत्नी हर्षदासह दुग्ध व्यवसायात उतरले.

मोठा पगार, पण समाधान नाही

नवनाथ कुदळे काही काळ बाणेर येथील आयटी कंपनीत नोकरी करत होते. पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि चांगला पगार असूनही मनाला हवी तशी शांती आणि आनंद मिळत नव्हता. अखेर त्यांनी आपल्या पिढीजात शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी हर्षदा यांनीही पूर्ण साथ दिली.

शिक्षणापासून गोठ्यापर्यंतचा प्रवास

2018 मध्ये B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) पूर्ण करून नवनाथ यांनी MSc पदवीही मिळवली. पण उच्च शिक्षणानंतरही त्यांनी संगणकाचा माऊस बाजूला ठेवून गायी-म्हशींसोबत नवा प्रवास सुरू केला. “या कामात मला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं,” असं ते हसत सांगतात.

रोज 60 लिटर ताजं दूध

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळे गावात त्यांनी स्वतःचा सुसज्ज गोठा उभारला आहे. सध्या त्यांच्या कडे मुऱ्हा जातीच्या 5 म्हशी आणि गीर, साहिवाल या संकरित जातीच्या 4 गायी आहेत. रोज सरासरी 60 लिटर दूध उत्पादन होते, तर चांगल्या गायींचे दूध 9-10 लिटरपर्यंत जाते.

आर्थिक हिशोब

गोठा चालवण्यासाठी महिन्याचा खर्च सुमारे 1 लाख रुपये येतो. त्यातून 30-35 हजार रुपयांचा शुद्ध नफा मिळतो. म्हशीच्या दुधाचा दर 85-90 रुपये लिटर असून, ग्राहक पिशवीतील दुधाऐवजी ताजं, नैसर्गिक दूध जास्त पसंत करतात. कुदळे स्वतः दुचाकीवरून पुनावळे आणि आसपासच्या परिसरात दूध पोहोचवतात.

शहरातील तरुणांसाठी आदर्श

मोठा पगार आणि कॉर्पोरेट आयुष्याच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी नवनाथ-हर्षदा कुदळे यांची ही कथा प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिलं की, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातही आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान मिळवता येतं.

Leave a Comment