अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतासमोर कठीण आव्हान उभं केलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात झंझावात निर्माण करणाऱ्या त्यांच्या निर्णयामुळे, भारतावर आता थेट २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या काही महत्त्वाच्या आयातींवर लागू होणारं एकूण शुल्क ५० टक्क्यांवर पोहोचणार आहे.
हा निर्णय २७ ऑगस्टपासून अंमलात येणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. ट्रम्प यांच्या मते, भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली असून, हे थेट युद्धसामग्रीला इंधन पुरवण्यासारखं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हितासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रम्प यांचा आक्रमक इशारा
अलीकडेच ट्रम्प यांनी भारताला “अविश्वासू व्यापार भागीदार” म्हणत टीका केली होती. “भारत आमच्याशी व्यापार करतो, पण आम्ही त्यांच्याशी करत नाही,” असं म्हणत त्यांनी याआधीच २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र केवळ २४ तासांतच त्यांनी निर्णय बदलत त्यात आणखी २५% वाढ केल्याचं जाहीर केलं.
रशिया-भारत तेल व्यवहार ट्रम्प यांना खटकतोय?
ट्रम्प यांची नाराजी भारत-रशिया दरम्यान चालू असलेल्या तेल व्यवहारावर केंद्रित आहे. ते सातत्याने भारताच्या या भूमिकेवर टीका करत असून, यामुळे अमेरिकेच्या धोरणांना धक्का पोहोचतो, असं ते म्हणत आहेत. विशेषतः युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या समर्थनासारखी ही कृती भासते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
भारतासाठी मोठा आर्थिक फटका?
या टॅरिफ निर्णयामुळे भारतातील निर्यातदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी, औषधनिर्मिती, आणि तांदूळ यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. याशिवाय, भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
