मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पारंपरिक शेतीची चौकट मोडून शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी एक वेगळी वाट धरली — आणि ती वाट होती ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची. 2023 मध्ये केवळ एका एकरात त्यांनी केलेल्या या प्रयोगातून, आज ते एकरी 6 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक प्रयोग
दिगंबर चव्हाण यांनी जून 2023 मध्ये आपल्या एका एकर शेतात 200 पोलवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. या संपूर्ण लागवडीवर 1 ते 2 लाखांचा खर्च आला. सुरुवातीपासूनच त्यांनी हा प्रयोग व्यवसायाच्या दृष्टीने केला आणि बाजारपेठेचा अभ्यास करूनच त्यात पाऊल ठेवले.
शेतीतून लाखोंचं उत्पन्न
ड्रॅगन फ्रूट एक अत्यंत फायदेशीर पीक ठरत आहे. चव, पोषणमूल्यं आणि आकर्षक रंगामुळे या फळाची बाजारात मोठी मागणी आहे. चव्हाण यांना एकरी 6 ते 8 लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे — तेही सर्व खर्च वजा करून!
ते सध्या स्वतःच्या शेतातूनच विक्री करत आहेत. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई या प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या फळांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बाजारात सध्या ड्रॅगन फ्रूटचा दर 60 ते 80 रुपये किलो इतका आहे.
एकदाच लागवड, 12 वर्ष उत्पन्न!
ड्रॅगन फ्रूटची ही शेती एकदा केल्यावर 10 ते 12 वर्षांपर्यंत उत्पन्न देणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे दीर्घकालीन लाभाचं पीक ठरतं. काढणी, देखभाल आणि विक्री यामध्येही तुलनेनं कमी श्रम आणि खर्च येतो.
दिगंबर चव्हाण यांचा शेतकऱ्यांना सल्ला
“शेतीला टिकवायचं असेल, तर पारंपरिक मार्गाऐवजी नवे प्रयोग हवेच,” असं ठाम मत दिगंबर चव्हाण व्यक्त करतात. त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांची ड्रॅगन फ्रूट शेती पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून अनेक शेतकरी भेट देत आहेत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. हे फळ उत्पादनाचं यश त्यांच्या आत्मविश्वासाचं मोठं उदाहरण बनलं आहे.
