पेंशनधारक आणि विविध लाभार्थींसाठी सरकारच्या योजना अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्या सुरू ठेवण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते – हयातीचा दाखला. पूर्वी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगा, कार्यालयीन चकरा आणि वेळेचा अपव्यय होत असे. मात्र आता, केंद्र सरकारने ‘जीवन प्रमाण’ या अॅपद्वारे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि घरबसल्या करता येईल अशी बनवली आहे.
हयातीचा दाखला का आवश्यक?
निवृत्त सरकारी कर्मचारी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या अनेक योजनांचे लाभार्थी हे ‘हयात’ असल्याचे प्रमाण वेळोवेळी सादर करणे आवश्यक असते. यामागचा उद्देश अगदी साधा आहे – लाभ फक्त जिवंत व्यक्तींनाच मिळावा. जर एखाद्याने वेळेत हयातीचा दाखला सादर केला नाही, तर त्या व्यक्तीचे लाभ बंद होऊ शकतात. पेन्शन धारकांसाठी तर ही अट आणखी महत्त्वाची आहे, कारण त्यांची पेन्शन देखील थांबू शकते.
‘जीवन प्रमाण’ अॅप – आधुनिक उपाय, कागदपत्रांची झंझट संपली!
या सगळ्या अडचणींचा विचार करून केंद्र सरकारने ‘जीवन प्रमाण’ नावाचे डिजिटल अॅप तयार केले आहे. यामुळे निवृत्त कर्मचारी आता कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता, घरबसल्या आपले Life Certificate मिळवू शकतात. या अॅपचा वापर Android मोबाईल किंवा संगणकावर करता येतो.
अॅप वापरण्याची सोपी प्रक्रिया:
- प्ले स्टोअरवरून ‘Jeevan Pramaan’ अॅप डाउनलोड करा.
- अॅप उघडून नोंदणी करा.
- तुमचा आधार क्रमांक, नाव, बँक खात्याचा नंबर, मोबाईल नंबर आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर टाका.
- नंतरचे पाऊल म्हणजे फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication).
- माहिती सादर करताच तुमचे हयातीचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात तयार होते.
हे प्रमाणपत्र बँकेत किंवा संबंधित विभागात स्वतःहून पाठवले जाते, त्यामुळे वेगळे छापून नेण्याची गरज नाही.
हयातीचा दाखला काढण्याचं टेन्शन आता मिटलं!
‘जीवन प्रमाण’ अॅप मुळे लाखो निवृत्तांना मोठा दिलासा मिळालाय. हे अॅप EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) आणि इतर संबंधित विभागांकडून अधिकृत मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.
यामुळे केवळ वेळच वाचत नाही, तर वयोवृद्ध नागरिकांना होणारा त्रासही टळतो. या डिजिटल सुविधेचा लाभ प्रत्येक पेन्शनधारकाने घ्यावा, असा सरकारचा आग्रह आहे.
