नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका – अतिदुर्गम, डोंगराळ आणि पावसावर अवलंबून शेतीचा भाग. पारंपरिक शेती करणारा हा तालुका आता हळूहळू नव्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वी जिथे फक्त पारंपरिक भात लागवडीवर भर दिला जायचा, तिथेच आज शेतकरी सुगंधी आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या भात वाणांकडे वळताना दिसत आहेत.
परंपरेपासून नवतेकडे झेप
सातपुड्याच्या डोंगर दऱ्यांत वसलेल्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून फक्त पारंपरिक भात बियाण्यांची फेक पद्धतीने लागवड केली जात होती. पाण्याची टंचाई आणि खडकाळ जमिनीमुळे उत्पादन मर्यादित राहायचं. मात्र, कृषी विभागाचे मार्गदर्शन, शेतकरी मेळावे आणि बदलत्या हवामानाच्या जाणिवेमुळे शेतकऱ्यांनी आता पारंपरिकतेच्या चौकटी ओलांडून नव्या प्रयोगांकडे वळायला सुरुवात केली आहे.
सुगंधित भात वाणांची मागणी वाढतेय
अक्कलकुवा तालुक्यातील दहेलचा आणि ओघानी परिसरातील काही शेतकरी आता त्यांच्या उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करत, चिखल मशागत करून भाताची रोपवाटिका तयार करत आहेत आणि स्वतःच ती रोपे शेतीत लावत आहेत. यामध्ये “सुगंधित भात वाण” हा नवीन पर्याय शेतकऱ्यांना अधिक आकर्षित करत आहे – कारण यात उत्पन्न जास्त असून बाजारभावही समाधानकारक मिळतो.
स्त्रियांचा मोठा सहभाग
या नव्या बदलात महिलाही मागे नाहीत. लावणीच्या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय असून, त्यांच्या मेहनतीमुळेच भातशेती अधिक सशक्त आणि सक्षम होत आहे.
सातपुड्यात बदलते शेतीचे चित्र
कधी काळी फक्त जगवणूक देणारी शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुड्याच्या भागात आता उत्पन्नक्षम शेतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीला शासनाच्या योजनांचे पाठबळ लाभत असल्याने ही सकारात्मक घडामोड अधिक गतीने विकसित होऊ शकते.
