जालना जिल्ह्यातील शेतकरी विष्णुपंत गिराम यांनी शेतीतील वाढत्या खर्चावर मात करत एक नावीन्यपूर्ण मार्ग निवडला – SRT म्हणजेच सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक पद्धत. या आधुनिक पद्धतीने केवळ मशागतीचा खर्चच कमी केला नाही, तर मजूर टंचाईच्या प्रश्नालाही उत्तर दिलं.
शेतीत बदलाची गरज का निर्माण झाली?
आज शेती ही नफ्यापेक्षा अधिक खर्चाची वाटचाल झाली आहे. दरवर्षी वाढणाऱ्या बियाण्यांच्या, खतांच्या आणि मजुरीच्या दरांमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्यांची घटनाही वाढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विष्णुपंत गिराम यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत SRT ही नविन दिशा स्वीकारली.
SRT शेती पद्धती म्हणजे काय?
SRT (Saguna Regenerative Technique) ही एक पर्यावरणस्नेही आणि कमी मशागतीची शेती पद्धत आहे. या पद्धतीत सुरुवातीला एकदाच नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर यांचा वापर करून चार ते पाच फूट रुंद बेड तयार केले जातात. या बेडवर ठिबक सिंचनाचा वापर करून पीक घेतले जाते. एकदा पीक काढल्यानंतर, जमीन पुन्हा नांगरली जात नाही – हेच या तंत्राचे मुख्य वैशिष्ट्य!
फक्त दोन यंत्रं, मोठा फायदा
या पद्धतीत शेतकरी केवळ दोन यंत्रांचा वापर करतात – टोकण यंत्र (बियाण्याची पेरणी) आणि फवारणी यंत्र. तणनाशक फवारणीतून तणांवर नियंत्रण ठेवले जाते. आणि पिकं काढल्यानंतर त्यांचे अवशेष बेडवरच ठेवले जातात. त्यामुळे मातीची उत्पादकता टिकते आणि मशागतीसाठी पुन्हा पुन्हा पैसा खर्च करण्याची गरज लागत नाही.
जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो – परिणाम चांगले
SRT पद्धतीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, जो माणसाच्या हिमोग्लोबिनप्रमाणे जमिनीचं आरोग्य ठरवतो. जमिनीत नैसर्गिक कर्ब वाढल्याने पिकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे उत्पादनात सातत्य येते आणि रासायनिक खतांवरील अवलंबनही कमी होते.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
गिराम यांनी ही शेती करताना अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी सांगितले की, “SRT शेती ही खरंच आनंददायी शेती आहे. शेतात काम करताना समाधान आणि आत्मिक समाधान मिळतं.” त्यांनी इतर शेतकऱ्यांना आवाहन केलं की, पारंपरिक पद्धतीचा पुनर्विचार करा आणि शाश्वत शेतीकडे वळा.
