“शिक्षिकेची नोकरी सोडून थेट शेतीत उडी: वैजयंती घारपुरेंची यशोगाथा”

शिक्षिकेची स्थिर नोकरी सोडून कोणी थेट शेतीत उतरावं? तेही कोणत्याही पारंपरिक शेतीपद्धतीऐवजी प्रयोगशील नैसर्गिक शेती करायला? हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण नागपूर जिल्ह्यातील सुकळी घारपुरे गावातील वैजयंती घारपुरे (गोखले) यांनी हे करून दाखवलंय!

लहानपणापासूनच जमिनीशी नातं…

वैजयंती यांचे वडील अनुभवी शेतकरी होते. त्या लहानपणापासून वडिलांसोबत शेतात जायच्या, त्यांच्याकडून शेतीची बारकावे शिकायच्या. तेच शेतीचं बीज त्यांच्या मनात रोवून गेलं. वडिलांच्या आजारपणामुळे घरची शेती मागे पडू लागली आणि त्या काळात वैजयंती शिक्षिकेची नोकरी करत होत्या. वडिलांचे निधन आणि नंतर आईचे खंबीरपणे शेतीचे काम हाताळणे, यामुळे त्या शेतीकडे ओढल्या गेल्या.

शिक्षिका ते प्रयोगशील शेतकरी…

2018 मध्ये आईच्या निधनानंतर वैजयंतींनी ठरवलं – आता पूर्णवेळ शेतीच करायची! शिक्षिकेची नोकरी सोडून त्यांनी शेतातच आपलं आयुष्य झोकून दिलं. सुरुवातीला रासायनिक शेती केली, पण समाधान मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी काका श्याम घारपुरे (कृषितज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला.

नैसर्गिक शेतीत यशाचे अंकुर…

शेतीतील नवकल्पनांमध्ये त्यांनी गांडूळखत निर्मिती, जैविक औषधे तयार करणे, प्रक्रिया करून विक्री करणे हे मार्ग स्वीकारले. अंबुजा फाउंडेशन, आत्मा संस्था अशा विविध संस्थांच्या सहकार्याने त्यांच्या शेतीच्या उपक्रमांना गती मिळाली.

शेती आणि प्रक्रिया उद्योग यशस्वी!

त्यांच्याकडे 10 एकर स्वत:ची आणि 5 एकर भाडे तत्वावर अशी एकूण 15 एकर शेती आहे. कपाशी, तूर, भाजीपाला, सोयाबीन, चणा अशा मिश्र पद्धतीची शेती त्या करतात. त्यात विशेष म्हणजे – तुरीची डाळ त्या स्वतः तयार करून विकतात, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळतो.

15 लाखांची उलाढाल; प्रेरणादायी वाटचाल

आज वैजयंती घारपुरे यांची वार्षिक उलाढाल 13 ते 15 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांनी एक गोष्ट ठामपणे दाखवून दिली – शेती ही नुसती परंपरा नाही, ती एक संधी आहे!

Leave a Comment