पाऊस थैमान घालणार! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका, प्रशासन सतर्क

महाराष्ट्रात मान्सूनने आता आपली तीव्रता वाढवली आहे. हवामान खात्याने किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांसाठी गंभीर इशारे दिले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानुसार, 23 जुलै सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 24 जुलै रात्री 8.30 पर्यंत मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये समुद्रात 3.6 ते 4.3 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही लाटांची उंची 3.4 ते 3.8 मीटर असू शकते.

या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, अशी सूचना राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिली आहे. लहान बोटी आणि होड्या समुद्रात जाऊ नयेत, अन्यथा जीवितहानीची शक्यता नाकारता येणार नाही.

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पुढील २४ तास अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पथक सज्ज ठेवण्यात आले असून स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पावसामुळे काही भागांमध्ये पूरस्थितीही उद्भवली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील हदगाव नखाते गावात 117.8 मिमी पावसामुळे परिसर जलमय झाला. सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. आपत्कालीन बचाव पथकाने तात्काळ मदतकार्य सुरू करत, छतावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बरडा गावातही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. येथील एका मंदिरात अडकलेल्या तीन नागरिकांना स्थानिक प्रशासनाने मदत करून सुखरूप बाहेर काढले.

राज्यभरात पुढील काही दिवस हवामानात अस्थिरता राहणार आहे. विशेषतः किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे, असे आवाहन राज्य प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment